खानापूर लाईव्ह न्युज
खानापूर: गेल्या आठवड्याभरापासून गणेबैल टोल प्लाझा सुरू करण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचाली व शेतकऱ्यांचा त्या विरोधात असलेला आक्रोश यावर अखेर पडदा पडला. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वतः तब्बल तीन तास खानापूर येथील विश्रामधामात आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार दिगंबर पाटील सह भाजप समिती नेत्यांच्या उपस्थितीत तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक केली. व महामार्ग, टोल संदर्भात, तालुक्यातील विविध विकास कामा संदर्भात चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेत खानापूर तालुक्यातून बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्ग सुरू करण्यासाठी भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांना 2011 च्या आवार्ड्स प्रमाणे जमिनीची व्हॅल्यू फारच कमी आहे. त्यातच नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई झाल्यामुळे आतापर्यंतचे किमान 9 टक्क्यांनी व्याज शेतकऱ्यांना मिळून देण्यात यावे. व तसेच 2013 च्या अवार्ड मार्केट व्हॅल्यू प्रमाणे भूसंपादीत जमिनीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी धरली. त्याचप्रमाणे भूसंपादित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना महामार्ग प्राधिकरणाच्या काडेस नावाच्या अधिकाऱ्याने बरीच तफावत केली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावरही कारवाई करावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी केली. बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गाचा उर्वरित रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी व संपर्क रस्ते पूर्णत्वाला आणण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या हुबळी विभागीय अधिकाऱ्यानी दोन दिवसात महामार्गाची पाहणी करून उर्वरित रस्ते पूर्ण करावेत अशी सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील , भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भाजप अध्यक्ष संजय कुबल, समिती नेते मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी चेतन मनेरीकर, शेतकरी नेते कल्लाप्पा घाडी, प्रवीण पाटील सह भाजप, समितीचे बरेचसे नेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण आहोत, शेतकऱ्यांच्या ज्या भूसंपादित झालेल्या जमिनी आहेत, या संदर्भात पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तब्बल तीन तास जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बैठक करून शेतकऱ्यांच्या समस्याचे निवारण केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या महामार्गाची समस्या व टोल नाक्या संदर्भातल्या मार्ग सूची केल्या.
त्याचप्रमाणे खानापूर शहरांतर्गत असलेल्या महामार्ग संदर्भात आमदार विठ्ठल हलगेकर सह उपस्थितानी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व क्रमबद्धरीत्या विषयाची मांडणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंदर्भात सकारात्मक उत्तरे देऊन खानापूर तालुक्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू यासाठी या भागातील लोकांची ही सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गणेबैल टोल प्लाजा सुरू होणारच!
यावेळी गणेबैल नजीकचा टोल प्लाजा सुरू करण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी आक्षेप व्यक्त केला. पण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र टोल प्लाझा सुरू करण्यासंदर्भात जेवढा रस्ता पूर्ण झाला आहे. त्या रस्त्याला अनुसरूनच वाहनाला कर वसुली केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टोल प्लाजा बंद होणे शक्य नाही. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यात टोल प्लाजा च्या परिसरात 20 किलोमीटर अंतरावर येणाऱ्या शेतकऱ्यांना महिनाकाठी तीनशे रुपये भरून पास देण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी टोल प्लाजाच्या ठिकाणीच फास्टट्रॅग करण्यासाठी वाहनधारकानी आपल्या विहित कागदपत्रांनिशी पास करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खानापूर शहरांतर्गत रस्ता दुरुस्तीची पहावी लागणार वाट ?
खरंतर ,खानापूर शहरांतर्गत राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे उपस्थितानी केली. परंतु हा रस्ता वन टाइम डेव्हलपमेंटच्या हिशोबाप्रमाणे 13 कोटी साठी प्रपोजल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून त्वरित ती मंजुरी करून ह्या रस्त्याच पण टाईम डेव्हलपमेंट साठी प्रस्ताव असून हा महामार्ग प्राधिकरणाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ता हस्तांतरित केल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्णत्वाला येणार असल्याचे यावेळी चर्चेअंती निष्पन्न झाले. त्यामुळे हा शहरांतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत वाट पहावी लागणार यात शंका नाही. याशिवाय खानापूर तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांना उच्च दर्जा देण्यासाठी आपला प्रस्ताव असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थिताना सांगितले.