संपादकीय :
पिराजी कुऱ्हाडे /
गेल्या अनेक वर्षात पत्रकारांनी लिहून लिहून पेनाची शाई संपली, लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी आवाज उठवले, अनेक आजी-माजी आमदारानी, लोकप्रतिनिधींनी समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावही केले, पण पर्यावरणवादीना चिकटून बसलेल्या अन टेबलाखालून पानाचे घडे गिरवणाऱ्या वनविभागाने मात्र याची कधीच कदर केली नाही. उलट कायद्याच्या टोकावर बोट ठेवून पर्यावरणवाद्यांची जुलूमगिरी करत स्वातंत्र्यानंतर ही पारतंत्र्याच्या जोखंडात या भागातील नागरिकांना अडकणाऱ्या जुलमी प्रशासनाला काय म्हणावे ? या भागातील नागरिक म्हणतात, आम्ही भी मागत नाही, हक्क मागतोय, जंगलाचे रक्षण करते तुम्ही नाही, तर आम्हीच आहोत, जंगली प्राणी आमच्या आवाजाला साद देतात, तुम्हीच मात्र जंगलाला टेबलाकडून लुटणारे शिकारी आहात. आम्ही काय मागतो फक्त जगण्यासाठी आवश्यक सुविधा आणि सुसज्ज रस्ता. पण तोही देण्याची ती तुम्ही अडसर बनताय, काय म्हणावे तुमच्या या नीयतीला ही आर्त हाक आहे, खानापूर तालुक्याच्या कोंगळा, पास्टोळी, गवाळी, कृष्णापुर, पाली, देगाव तळावडे सह अनेक दुर्गम भागातील खेडे गावच्या नागरिकांची.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, मादाई सह उपनद्यांना पुरेपूर पाणी आले आहे. त्यामुळे आता गावचा रस्ता शोधण्याची वेळ या भागातील नागरिकांच्या वर आली आहे. प्रामुख्याने गवाळी, पास्टोली ,या गावांना जोडणाऱ्या महादाई नदीवर आता पुरेपूर पाणी आले आहे. पावसाळ्यात दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा अन् साकवाचा आधार अशा उक्तीप्रमाणे नेहमीची बांधावा लागतो साकव अशी परिस्थिती या भागातील आहे. उद्योजक नाशिक बागवान यांनीही कोंगळा रस्त्यावर एका लोखंडी अडीचा आधार दिला, पण मादाईच्या रुद्रावतारापुढे ही अडीही तोकडी पडते. त्यामुळे पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागतो. सध्या मादाई नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी जीवन जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आमची ही समस्या थोडी जाणून घ्या अशी आर्त हाक या भागातील नागरिकांनी केली आहे. नेरसा ते कोंगला , पास्तोळी पर्यंतच्या या रस्त्यासाठी माजी आमदार दिवंगत प्रल्हाद रेमानी यांनी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून रस्त्याची मंजुरी केली. पण पर्यावरणवाद्यांनी हा रस्ता अडवलाच. त्याचा नंतर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. पण या रस्त्याचे त्रागडे काही सुटेना, त्यामुळे आम्ही अजून किती वर्षे असेच पारतंत्र्यात जगायचे ? हा प्रश्न या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्याच्या लोंढा भागातील काहीं नद्या उपनद्यावर साकव ऐवजी बंधाऱ्यांची निर्मिती झाली थोडीफार समस्या सुटली आहे. पण कोंगला,पास्टोळी तसेच कृष्णापुर सारख्या भागातील ही समस्या कधी सुटणार असा प्रश्न या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली,पण खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील काही गावे आजही पारतंत्र्यातच आहेत. ना,शासकीय सुविधा. ना, सुविधरस्ता, यामुळे पावसाळा आला की, नको रे बाबा ! हे जीवन जगणे.अशी म्हणण्याची वेळ येते. जंगलाच्या पट्ट्यात दुर्गम भागात राहणाऱ्या ह्या गावकऱ्यांनी जगावे कसे? हा प्रश्न आजही निरुत्तरितच आहे. खानापूर शहर व परिसरातील सखल भागात कधी रस्त्यावर खड्डे पडले, कधी वीज गेली आणि कधी राशन मिळाले नाही, तर सदन माणसे आटापिटा करतात, सरकारच्या लोकप्रतिनिधींच्या ठिणग्या उडवतात. पण गेल्या अनेक पिढ्यान पिढ्या जंगलाच्या, हिस्त्र प्राण्यांच्या सानिध्यात राहून जगत आलेल्या त्या दुर्गम भागातील नागरिकांची व्यथा काय असणार. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. पण या भागातील नागरिकांनी केवळ आम्हाला रस्ता द्या, एवढीच मागणी केली आहे. पावसाळा आला की, दाट चिखलाच्या वाटेतून वाट काढत जाणे, पायात कधी कानट अंगावर चढतील, याची शाश्वती नाही. मादाईला कधी पूर येईल, अन् वाट कधी बंद होईल याची धास्ती, दुसरीकडे जंगली प्राण्याचा डरकळणारा आवाज , मात्र याची भीती कधीच नाही. अशा परिस्थितीत जगणाऱ्या या माणसांची परिस्थिती सूट बूट घालून खुर्चीवर बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कधी कळणार! राजकारणाच्या खुर्चीवर बसणाऱ्या पांढऱ्या हत्तींना आमची कळ कधी कळणार असा प्रश्न, अन् ही व्यथा आहे खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक खेड्यांची.
कृष्णापुर ते खानापुरात.. समस्याचा डोंगर …
खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटात असलेले कृष्णापुर गाव हे तालुक्याच्या शेवटचे गाव. हेमडगा पासून जंगलाच्या वाटेने तळावडे मार्गे गेल्यास तसे जवळचेच. पण भीमगड अभयारण्याच्या घनदाट जंगलातून जाताना पावसाळ्यातील वाट जोखमीची ठरते. हे या भागातील नागरिकांना अन् वन खात्याला तेवढेच जमते. त्यामुळे कृष्णापूर वाशियाना गोवा,वाळपई मार्गे एकच पर्याय आहे. पण तीही वाट अवघडच आहे. कृष्णापुर पासून वाळपई पर्यंत 30 किलोमीटर आणि कृष्णापुर पासून हेमडगा पर्यंत 30 किलोमीटर असा भीमगड अभयारण्यातून जाणारा हा जंगलाचा प्रवास म्हणजे कृष्णापुर वाशियाना ना घर का! ना घाट का !अशी परिस्थिती निर्माण आहे. तीन ठिकाणी अडीचा धोकादायक आधार घ्यावा लागतो. अन पावसाळ्यात हा रस्ता नेहमी बंदच, त्यामुळे पावसाळ्यातील जिने नको रे बाबा ! अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे पंधरा ते वीस घरे असलेल्या कृष्णापुरात आता फक्त घराचे खोके तेवढेच दिसतात. पावसाळ्यातील सहा महिन्याची बिदागी एकदाच जमवुन केवळ जुने जाणते लोक तेही हातावर मोजण्या इतके घरात राहणारे लोक आहेत.त्यामुळे कृष्णापुर हे गाव हळुवारपणे लुप्त होताना दिसते. खानापूर तालुक्यात असूनही नसल्यासारखे आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी हळुवारपणे गोव्यातच राहणे पसंत केले आहे. कृष्णापुरातील निसर्गरम्य वातावरण व पर्यटकांना देणारी साद ही आकर्षणीय आहे. पण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटनवादी पर्यावरणवाद्यांनी या गावांना मात्र अडचणीत आणले आहे. त्यामुळे येथील लोक पर्यावरणवाद्यांना तर सोडाच, पेपर वाल्यानाही जुमानत नाहीत. कारण नको ते लिखाण करून येथील लोकांना जगणेच मुश्किल केले आहे. त्यामुळे आता जगण्याचा मार्ग बदलला असून हळुवारपणे कृष्णापुर वासियांचे गोव्यात स्थलांतर होताना दिसते.