IMG_20230708_203334

हिडकल. पुणे-बंगळुरू महामार्गावर संकेश्वर-बेळगांव दरम्यान् बेळगांवपासून ४० तर संकेश्वरपासून २७ किलोमीटर अंतरावर हुन्नूर येथे आहे.

बेळगांव: हिडकल जलाशयाच्या पाण्याखाली हुन्नुरचे हेमांडपंथी श्री विठ्ठल मंदिर व गाभाऱ्यातील मातीची मूर्ती तब्बल ४६ वर्षानंतरही सुस्थितीत आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे ५१ टीएमसी क्षमतेच्या जलाशयातील पाण्याने यावर्षी तळ गाठल्याने तब्बल चार दशकानंतर पहिल्यांदाच हे मंदिर पूर्णत: पाण्याबाहेर आले आहे. त्यामुळे बेळगांव जिल्ह्यासह सीमाभागातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

१९७७ मध्ये जलाशयाचे काम पूर्ण झाले. हिडकल जलाशयाच्या निर्मितीनंतर बुडीत क्षेत्रातील विस्थापित २४ खेड्यांपैकी हुन्नूर ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. ३० बाय ३० आकाराचे हे मंदिर काळ्या पाषाणात स्थानिक कारागीरांनी चुनखडीत बांधले आहे. मंदिराचे खांब, चौकटी, खिडक्या, छत, तसेच सुमारे ४० फूट उंचीचे शिखरही दगडी आहे. १९७३ मध्ये जलाशयामुळे गाव विस्थापित झाल्यानंतर शासनानें ‘सिमेंट काँक्रीट’मध्ये विठ्ठलाचे नवे मंदिर बांधून दिले. परंतु, ते पाडून कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जुन्या मंदिराची प्रतिकृती तयार केली.

सुमारे ३०० उंबऱ्याच्या गावातील जवळपास अडीचशेह कुटुंबे धनगर समाजाची आहेत. त्यांच्याकडेच मंदिराची पूजा आहे. उर्वरित लिंगायत, ब्राम्हण, बेडर, मुस्लिम, हरिजन कुटुंबे मंदिराचे हक्कदार आहेत. जलाशयातील पाणी ओसरून मंदिरात जाण्यास वाट झाली तरच जुन्या मंदिरात अन्यथा जलाशयाच्या काठावरूनच पूजा- अर्चा केली जाते. नव्या मंदिरात नित्यनियमाने दैनंदिन पूजा-अर्चा होते. मंदिराची व्यवस्थापन समिती / ट्रस्ट नाही. संपूर्ण ग्रामस्थच मंदिराचे व्यवस्थापन करतात. मंदिराचे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. जुने आणि नवीन दोन्ही मंदिरे लोकवर्गणीतूनच बांधण्यात आले आहे.

या मंदिराबाबत आख्यायिका की :

निवडुंगाच्या झुडपातील वारूळात विठ्ठलचा वास होता. त्याठिकाणी येताच पाटलाच्या गाईला आपोआप पुन्हा फुटायचा. गावातील एका माणसाच्या स्वप्नात येवून देवाने सांगितले की, ‘मी विठ्ठल आहे… माझी पूजा करा’. त्यामुळे गावकऱ्यांनी वारूळाची पूजा करून त्याचठिकाणी मंदिर बांधण्यात आले.

विठ्ठल मंदिर असले तरी याठिकाणी विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती नाही. वर्षानुवर्षाच्या ‘चंद्र’लेपणामुळे वारूळावर शेंदूरसदृश्य थर तयार झाला आहे. ४६ वर्षे पाण्यात राहूनही हे वारूळ विरघळलेले नाही, त्यावरील घोंगड्याची घडीही मोडलेली नाही.

दरवर्षी दसरा व गुढीपाडव्याला यात्रा भरते. त्याशिवाय रविवारी व अमावस्येला दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. यात्रेत जोतिबाच्या यात्रेप्रमाणे येथेही सासनकाठ्या नाचवतात. पालखीत पितळेच्या ३ मूर्ती आहेत. त्या ‘ब्रम्हा, विष्णू, महेश’च्या आहेत, असे ग्रामस्थ सांगतात.

.

१९२८ मध्ये केवळ आठ हजारात बांधले होते मंदिर

  • १९२८ मध्ये केवळ ८ हजारात शिंगाडी मायाप्पा पुजारी, बाळाप्पा रंगाप्पा गडकरी, गुरूनाथ संभाजी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले आहे.
  • जुन्या मंदिराच्या आवारातील घोड्याचा तबेला, शाळा व स्वयंपाकाची खोली पाण्यामुळे पडली आहे. परंतु, मंदिराचे भव्य दगडी प्रवेशद्वार व सनई, चौघड्याची दुमजली खोली अद्याप शाबूत आहे.
  • भाविक देवाला केवळ केळीचा नैवद्य ठेवतात. कुणी पैसे ठेवल्यास त्यातील फक्त ५ रूपये पुजारी घेतात, उर्वरित रक्कम देवस्थानच्या खर्चासाठी वापरले जाते.
  • पूर्वी यात्रा, दर रविवारी व अमावस्येला अन्नदासोह (महाप्रसाद) केला जात होता. परंतु, भाविकांची संख्या वाढल्यामुळे सध्या गावातील घराघरातून येणारी आंबील प्रसाद म्हणून वाटली जाते. – जलाशयातील मंदिराच्या आजूबाजूला श्री बसवण्णा, श्री. लक्ष्मी, श्री दुर्गामाता यांची छोटी मंदिरे आहेत. यापैकी बसवाण्णा मंदिर अद्याप निम्मे पाण्यातच आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us