IMG_20230331_083419

पिराजी कुऱ्हाडे, खानापूर

खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचा अभेद बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभा मतदार क्षेत्रात 2023 चा सत्ताधीश कोण ठरणार? याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.त्यात प्रामुख्याने खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा नेमका उमेदवार कोण? पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात उमेदवारी कौल देणार? याकडे अधिक कटाक्षाने सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपच्या उमेदवारीवर खानापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
तालुक्यातील राजकारण सध्या तापले आहे. भाजप आणि काँग्रेसच्या चुरशीच्या चढाओढीत म. ए. समितीचा भगवा फडकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या डॉ. अंजली निंबाळकर या काँग्रेसच्या आमदार आहेत. 2013 च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी 2018 मध्ये तगड्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळविला होता. खरेतर भाजपा व म. ए. समितीच्या बेकीचा फायदा त्यांना झाला होता. भाजपमधील बंडाळीही त्यांना फायद्याची ठरली. पाच वर्षात विकास कामे राबवून आपण जनतेपर्यंत पोहोचलो असल्याचा त्यांना आनंद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘सर्वांची साथ काँग्रेसचा हात’ असा दावा त्यांनी केला आहे.


तालुक्यात मागील निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपाने संघटनात्मक कामाला जोर लावला आहे. अनेक जण इच्छुक असले तरी एकीची वज्रमूठ राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या भाजपमध्ये उमेदवारीसाठी कमालीची चढाओढ आहे. महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार अरविंद पाटील हे दोघेही पक्ष श्रेष्ठींच्याकडे तगादा लावून उमेदवारी साठी कसोटीने प्रयत्न करत आहेत. शिवाय जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप राज्य कार्यकारणी सदस्या धनश्री सरदेसाई, संजय कुबल यांनीही आपली ताकद कोणाला लावली आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार तालुक्याच्या राजकारकारणाची दिशा ठरणार आहे. शिवाय आमआदमी पक्षानेही तालुक्यात यावेळी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मागील निवडणुकीत तिसऱ्या रांगेत उभे राहिलेले नासिर बागवान यावेळी आपणही कमी नाही. असा अट्टाहास करून पुन्हा एकदा निजदचे उमेदवार म्हणून कामाला लागले आहेत. काँग्रेस, निजद चे उमेदवार ठरले असले तरी भाजप नंतर महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारीच्या चर्चेत आहे. समितीतून सात जणांनी इच्छुकता दर्शवली असली तरी प्रामुख्याने मुरलीधर पाटील,निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष आहे. त्यातच समितीच्या आणखी एक गटाने दुसरी चूल मांडत परस्पर बैठका घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे त्या गटाची सक्रियता काय राहणार याकडे मराठी मतदारांचे लक्ष लागले आहे. या चौफेर राजकारणात खानापूर तालुक्यातील सुज्ञ मतदार पक्षाचे चिन्ह तारणार की समिती निष्ठा राखणार, की एखादा प्रबळ अपक्ष उमेदवार रिंगणात राहिला तर त्याचा विचार करणार याकडे लक्ष लागले आहे.
खानापूर तालुक्यात 2 लाख 8 हजार मतदार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जवळपास 1.30 लाख मतदार मराठी भाषिक आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या मतदारांची गणती लक्षात घेता मराठीचा बालेकिल्ला या भागातून कोणीही हटू शकणार नाही. पण अलीकडच्या काळात समितीतील विसंगती, मतलबी राजकारणी यामुळे मराठी माणूस विखुरला जात आहे.
खानापूर तालुक्यात एरवी जवळपास 20 हजारच्या वर आकडा न गाठलेल्या काँग्रेसला 36 हजाराचे मताधिक कसे मिळाले? समितीची अधिक मते का कमी झाली? भाजपची मागील दोन निवडणुकीतील एकूण मत संख्या 30 ते 35 हजाराच्या घरात आहे. पण ती संख्या मागील निवडणुकीत का घटली? याचे चिंतन होणे गरजेचे आहे.शिवाय निजद उमेदवार नासिर बागवान यांना मिळालेली 28 हजार ही मते अनपेक्षित होती. निधर्मी जनता दलाचे प्रबळ यापूर्वी कधीच नव्हते. केवळ नासिर बागवान यांनी आपल्या कर्तुत्वावर हे मताधिक्य गाठले आहे. त्यांना मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये कक्केरी व पारिषवाढ या दोन जिल्हा पंचायत क्षेत्रातीलच मते 18000 च्या घरामध्ये पडली होती. तर उर्वरित 10 हजार मते मराठी भागातून त्यांना मिळाली होती. ती केवळ त्यांच्या कार्यप्रणालीमुळे झाली होती.
खानापूर तालुक्यात भाजपची मतदार संख्या अधिक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण यासाठी भाजपच्या कोणालाही उमेदवारी दिली तरी यश निश्चित आहे. पण बंडखोरी ही मारक ठरेल. काँग्रेसच्या आमदार निंबाळकर यांनी मागील निवडणुकीत 36 हजारचा आकडा हा त्यांच्या नवीन ओळख व जनसंपर्काची पोचपावती होती. महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच भाजपला मात्र स्वतःच्याच घरातील बेंदिलकी पराभवास कारणीभूत ठरली होती. पण आता हा वचपा भरून काढण्यासाठी भाजपने कसून कंबर कसली आहे.पण उमेदवार कोण? असा प्रश्न भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर उभा टाकला आहे.
मागील निवडणुकीत विठ्ठल हलगेकर यांचा केवळ 3 हजार मतांनी निसटता पराभव झाला. हा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तितक्याच ताकदीने अरविंद पाटील ही समितीला काडीमोड करत भाजपात प्रवेश करून आपल्या समर्थकांची आकडेमोड घेऊन भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांनीही जीव तोडून प्रयत्न करत आहेत. पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार तर नाही ना? असा प्रश्नही भाजप मतदारात निर्माण झाला आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us