सीतावडा-रामनगरचा सुपुत्र अर्जुन शिंदे छोट्या पडद्यावर चमकला; बेळगावकरांचा अभिमान!
सीतावडा-रामनगरचा सुपुत्र अर्जुन शिंदे छोट्या पडद्यावर चमकला; बेळगावकरांचा अभिमान!
‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेत गोपीनाथ घोडेस्वारची भूमिका; चिमुकल्या कलाकाराच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक
पुणे /खानापूर / प्रतिनिधी : सीमाभागातील सीतावडा-रामनगर या गावचा सुपुत्र आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेला बालकलाकार अर्जुन शिंदे याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या लोकप्रिय मालिकेत गोपीनाथ घोडेस्वार ही खट्याळ विद्यार्थ्याची भूमिका साकारत अर्जुनने छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण केले आहे. त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून बेळगाव सीमाभागातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नारायण शिंदे आणि सोनिया शिंदे-काकतकर यांचा अर्जुन हा सुपुत्र असून तो पुण्यातील ॲसेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. लहान वयातच अभिनयाची आवड जोपासणाऱ्या अर्जुनने आपल्या कलागुणांच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
ओशन प्रोडक्शन हाऊस, ठाणे निर्मित आणि डॉ. सुशांत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नाईक बाईंची प्रमुख भूमिका साकारली आहे. सोशल मीडिया आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे मुलांवर संस्कार करताना पालक व शिक्षकांसमोर निर्माण होणारी आव्हाने या मालिकेत प्रभावीपणे मांडण्यात आली आहेत.
अर्जुनचा जन्म वडील नोकरीनिमित्त कुवेतमध्ये असताना परदेशात झाला. मात्र, त्याचे संगोपन भारतीय संस्कारांमध्ये झाले आहे. स्विमिंग, सायकलिंग, स्केटिंग, तबलावादन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत त्याने लहान वयातच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रवासात आई सोनिया आणि वडील नारायण यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
विशेष म्हणजे अर्जुनची छोटी बहीण अनुश्री हिनेदेखील याच मालिकेत नवोदित कलाकाराच्या भूमिकेत अभिनय केला आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबातील दोन्ही भावंडे अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करीत आहेत.
अर्जुनच्या यशाबद्दल खानापूर-बेळगाव मित्रमंडळ पुणे, बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन पुणे तसेच सीमाभागातील आणि पुणेस्थित बेळगावकर उद्योजकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोझा, ज्येष्ठ उद्योजक लक्ष्मणराव काकतकर, रामचंद्र निलजकर, मारुती वाणी, भगवानराव चन्नेवाडकर, अध्यक्ष विजय पाटील, सचिव शिवाजी जळगेकर, सहसचिव परशुराम निलजकर, बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केदार शिवणगेकर, अध्यक्ष संदीप घाडी, माजी अध्यक्ष दत्ता भेकणे, सचिन आंबेरकर, अतुल काकतकर, केदार शिवणगेकर आणि दत्तप्रसाद कदम यांनी अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त पांडुरंग काकतकर यांनीही आपल्या नातवाने अल्पवयात घेतलेली ही गरुडझेप संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
सीतावडा-रामनगरच्या मातीतून पुण्याच्या छोट्या पडद्यापर्यंत पोहोचलेल्या अर्जुन शिंदेच्या या यशामुळे सीमाभागाचा नावलौकिक वाढला आहे. भविष्यातही त्याने अभिनय क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.
खानापूर लाईव्ह