दुष्काळात तेरावा! शिंपेवाडीत भाताच्या गंजींसह गवताची गंजी जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान!
दुष्काळात तेरावा! शिंपेवाडीत भाताच्या गंजींसह गवताची गंजी जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान!
अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचे भात जळून खाक; प्रशासनाकडून पंचनाम्यासह नुकसानभरपाई देण्याची मागणी
शिंपेवाडी / प्रतिनिधी : आधीच यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता आगीचे संकट कोसळले आहे. शिंपेवाडी येथे आज (सोमवारी) ऐन दुपारी अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या दोन भाताच्या गंजींसह गवताची गंजी जळून खाक झाली. या घटनेत शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेत शिंपेवाडी येथील शेतकरी सुरेश निंगापा मळीक यांच्या शेतातील सर्व्हे क्रमांक ३९ मध्ये साठवून ठेवलेल्या दोन भाताच्या गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. तसेच अर्जुन मळीक यांच्या गवताच्या गंजीचेही मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुरेश मळीक यांचा शेती हाच उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. वर्षभर शेतात काबाडकष्ट करून, ऊन-पावसाची तमा न बाळगता त्यांनी भाताचे पीक घेतले होते. जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करत मोठ्या मेहनतीने पीक वाचवून त्याची कापणी करून शेतात गंजी घालून ठेवली होती. मात्र, मळणी करण्यापूर्वीच अचानक आगीने घाला घातल्याने वर्षभराची मेहनत क्षणात राख झाली.
यंदा पावसाने ओढ दिल्याने खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. माळरानावरील पिके पाण्याअभावी वाळून गेली, तर पाणथळ जमिनीतील भातपिके मोठ्या कष्टाने जगवून शेतकऱ्यांनी कापणी केली आहे. अशा कठीण परिस्थितीत हातातोंडाशी आलेले पीक आगीत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत भाताच्या गंजी आणि गवताची गंजी जळून मोठे नुकसान झाले होते.
प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी!
या घटनेची तहसीलदार, कृषी अधिकारी व संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून अधिकृत पंचनामा करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शिंपेवाडी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दुष्काळ, जंगली प्राण्यांचा उपद्रव आणि आता आगीचे संकट अशा एकामागून एक संकटांनी शेतकरी हतबल झाला असून, शासनाने या शेतकऱ्याला तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खानापूर लाईव्ह