तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची दमदार कामगिरी!
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची दमदार कामगिरी!
चित्रकला, प्रश्नमंजुषा, मूकअभिनय, लोकनृत्य, निबंध व भावगीत स्पर्धेत विद्यार्थिनींचे यश; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
खानापूर / प्रतिनिधी :
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या म. म. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाने तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपली कला, कौशल्य आणि प्रतिभेची चमक दाखवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कला शाखेची विद्यार्थिनी नफिसा सनदी हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेच्या संचिता गावळकर व जोया सनदी या जोडीने प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. मूकअभिनय प्रकारात कला शाखेच्या श्रेया भोसले हिने तृतीय क्रमांक मिळवला, तर लोकनृत्य अर्थात जानपद समूह नृत्यामध्ये महाविद्यालयाच्या कला शाखेच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच द्वितीय पीयूसी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी रंजीता खानापुरी हिने कन्नड निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. कला शाखेच्या प्रेमा कोलकार हिने भावगीत स्पर्धेत आपल्या सुमधुर आवाजाने परीक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांक मिळवला.
सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले क्रीडांगण, आवश्यक साहित्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळे विविध खेळांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महाविद्यालयाने आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, गतवर्षीच्या पीयूसी वार्षिक परीक्षेत खानापूर तालुक्यातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याची कामगिरी केली आहे.
या सर्व यशामागे मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई नागराजू यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, संचालक मंडळातील शिवाजीराव पाटील व परशराम गुरव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील व सर्व प्राध्यापकवर्ग यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विद्यार्थिनींच्या यशात मोठा वाटा आहे. हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव यांनीही गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
शिस्त, संस्कार, सांस्कृतिक जाणीव आणि शैक्षणिक गुणवत्ता या बळावर म. म. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर तालुक्यात शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थिनी, त्यांचे पालक, प्राचार्य आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.