खानापूर तालुक्यातील ३४ वर्षीय युवक हातकणंगले येथून बेपत्ता!
खानापूर तालुक्यातील ३४ वर्षीय युवक हातकणंगले येथून बेपत्ता!
गवाळी गावच्या संजय गावकर यांचा शोध सुरू; हातकणंगले पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद
खानापूर / प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातील गवाळी गावचा रहिवासी असलेला ३४ वर्षीय संजय गजानन गावकर हा युवक कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गावकर हा रुकडी येथील भोसले गल्लीमध्ये गुंडू रामा गावडे यांच्या घरात भाड्याने राहत होता. तो परिसरात गवंडी काम करून उदरनिर्वाह करीत होता. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास तो राहत असलेल्या घरातून बेपत्ता झाला.
संजय गजानन गावकर याचे वय ३४ वर्षे असून त्याच्या वडिलांचे नाव गजानन गावकर आहे. त्याचे मूळ गाव गवाळी, ता. खानापूर असे आहे. बराच काळ उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय व नातेवाईक चिंतेत आहेत.
या घटनेची माहिती खानापूर पोलिसांनाही देण्यात आली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हातकणंगले पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांना आवाहन : संजय गजानन गावकर यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास हातकणंगले पोलीस ठाण्याशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.