Home » कामतगा येथे श्री चव्हाटादेव समुदाय भवनाचे भूमिपूजन उत्साहात!

कामतगा येथे श्री चव्हाटादेव समुदाय भवनाचे भूमिपूजन उत्साहात!

Oplus_16908288

Oplus_16908288

कामतगा येथे श्री चव्हाटादेव समुदाय भवनाचे भूमिपूजन उत्साहात!

आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते भूमिपूजन; दर्जेदार विकासकामांवर भर देण्याचे आवाहन

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील मौजे कामतगा येथे शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री चव्हाटादेव समुदाय भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात पार पडला. या भवनाचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या समुदाय भवनासाठी सन १९७२ मध्ये कै. रामचंद्र ईश्वर पाटील यांनी जागा दान केली होती. ही जागा चव्हाटाची असल्याने येथे ‘श्री चव्हाटादेव समुदाय भवन’ उभारण्यात येत आहे. अनेक वर्षांपासूनच्या या जागेवर समुदाय भवन उभारण्याच्या कार्याला आता सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विकासकामे प्रलंबित ठेवण्याची पद्धत थांबवा : आमदार हलगेकर

यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले, “विकासकामे प्रलंबित ठेवण्याची पद्धत थांबवली पाहिजे. निधी मंजूर झाल्यानंतर संबंधित काम तातडीने सुरू होऊन ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे.” अनेकदा काम पूर्ण झाल्यानंतरही निधी मिळवताना किंवा आवश्यक कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विकासकामांना विलंब होतो. अशा अडचणी टाळून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गावातील विकासकामांसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगून, ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून एकजुटीने काम केल्यास मंदिराच्या स्वरूपातील सुंदर समुदाय भवन उभारता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी होणार उपयोग

या समुदाय भवनाचा उपयोग गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी होणार आहे. महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी या भवनाचा उपयोग होईल. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे भवन महत्त्वपूर्ण ठरेल, असेही आमदार हलगेकर यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी आणि इतर वर्गणीदारांच्या सहकार्यातून या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार हलगेकर यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अशोक वि. गवाळकर होते. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, भाजप नेत्या सौ. धनश्री सरदेसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ज. कुबल, भाजप नेते मल्लाप्पा मरीहाळ, स्थानिक नेते नारायण कापोलकर, दीपक देसाई, हणमंत जोशीलकर, नारायण पाटील यांच्यासह गावातील पंच कमिटीचे सदस्य, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री चव्हाटादेव समुदाय भवनाच्या भूमिपूजनामुळे कामतगा गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us