Home » खानापूर झेडपी-टीपी निवडणुकीसाठी काँग्रेस लागली कामाला!ಖಾನಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಗಳಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಜ್ಜಾಗುತ್ತಿದೆ!

खानापूर झेडपी-टीपी निवडणुकीसाठी काँग्रेस लागली कामाला!ಖಾನಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಗಳಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಜ್ಜಾಗುತ್ತಿದೆ!

IMG-20261013-WA0025

खानापूर झेडपी-टीपी निवडणुकीसाठी काँग्रेस लागली कामाला!

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश; इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले

खानापूर / प्रतिनिधी : आगामी जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका काँग्रेसने निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात आज रायगड निवासस्थानी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत, अशी सूचना केली.

या बैठकीला बेळगाव जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष बसवराज सिग्गावी उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे डॉ. निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बसवराज सिग्गावी यांचा सत्कार करण्यात आला.

अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड

बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपापली मते मांडली. निवडणूक नियोजन, उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक तयारीबाबत विविध सूचना करण्यात आल्या.

तालुका स्तरावर स्क्रीनिंग कमिटी स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांकडून प्राप्त होणारे सर्व अर्ज या समितीसमोर ठेवण्यात येतील. त्यानंतर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल, असे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी स्पष्ट केले. खानापूर तालुक्यातील सर्व भागांतून उमेदवार उभे करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील काही व्यक्तींनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून, योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महिला आरक्षणाबाबत समाधान

यंदा जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येने महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांचा राजकारणातील सहभाग वाढण्याची गरज डॉ. निंबाळकर यांनी व्यक्त केली. महिला आरक्षणामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असे मत त्यांनी मांडले.

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सावित्री मादार यांनीही महिला आरक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी मांडली मते

या बैठकीत ॲड. घाडी, मानतेश राऊत, लक्ष्मणभाऊ मादार, रियाझ पटेल, बेनी पिंटो, काशिम हट्टीहोळी, जिल्हाध्यक्ष बसवराज सिग्गावी तसेच डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आपापली मते मांडली.

उद्या खानापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

दरम्यान, निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात खानापूर काँग्रेसच्या वतीने उद्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता खानापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.३० वाजता आंबेडकर पुतळ्याजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us