खानापूर : २५ तोळे सोन्याचे दागिने लाटण्याचा एका ज्वेलर्सचा डाव ? ” त्या ” दुकानासमोर बेमुदत उपोषण! सामाजिक कार्यकर्ते रुक्माणा झुंजवाडकर यांचा इशारा!
oplus_6292480
२५ तोळे सोन्याच्या व्यवहारावरून वाद; ५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा रुक्माणा झुंजवाडकर यांचा इशारा
खानापूर शिवस्मारकात पत्रकार परिषद; दहा वर्षांपासून पाठपुरावा केल्याचा दावा
खानापूर / प्रतिनिधी :
२५ तोळे सोन्याच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादासंदर्भात रुक्मणा झुंजवाडकर यांनी २ ऑक्टोबर रोजी खानापूर येथील शिवस्मारकात कुटुंबीयांसमवेत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. संबंधित सोने व रकमेचा व्यवहार स्पष्ट करून न्याय मिळावा, या मागणीसाठी खानापूर स्टेशन रोडवरील एका त्या नामांकित ज्वेलर्सच्या दुकानासमोर येत्या ५ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पत्रकार परिषदेत झुंजवाडकर यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असून, तालुक्यातील काही ज्येष्ठ व्यक्तींना मध्यस्थीला घेऊन संबंधितांशी अनेक वेळा शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला . मात्र, अद्याप या प्रकरणाचा समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
२५ तोळे सोने कशा पद्धतीने दिले, याबाबत माहिती…
पत्रकार परिषदेत झुंजवाडकर यांनी २५ तोळे सोने आर्थिक गरजे करिता विश्वासावर त्या सोनाराला देऊन मी पाच लाखाची उचल केली होती व माझी गरज भागवली . नंतर महिन्याभरातच ती पाच लाखाची रक्कम वेळीच फेड केली. गहाण ठेवलेले सोने परत मागितले असता लॉकरमध्ये आहे. दोन दिवसात परत देतो असे सांगितले. पण आता त्या गोष्टीला दहा वर्षे होत आली तरी ते सोन्याचे दागिने तो ज्वेलरी परत देण्यास तयार नाही. कोणतीही पावती न घेता केवळ विश्वासाने ठेवलेले दागिने तो ज्वेलरी लाटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासंदर्भातील रक्कम व परतफेडीबाबत आपली बाजू सविस्तरपणे मांडली. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे व घडामोडींबाबतही त्यांनी माहिती दिल्याचे सांगितले.
या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित दुकानात जाऊन त्यांच्या कुटुंबांशीही संवाद साधल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
“मी खोटा ठरलो तर सोने सोडण्यास तयार”
आपल्या दाव्याबाबत बोलताना झुंजवाडकर यांनी आव्हानात्मक भूमिका मांडली. “या व्यवहारात माझे म्हणणे खोटे असेल किंवा त्या ज्वेलर्सचे म्हणणे खरे असेल, तर त्यांनी चौराशीदेवीसमोर कुटुंबीयांसह शपथ घ्यावी. त्यांचे म्हणणे खरे ठरल्यास मी ते सोने पूर्णतः सोडण्यास तयार आहे,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकाराचा दूरध्वनीद्वारे त्या सोनार यांच्याशी संपर्क
दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असतानाच पत्रकारांनी दूरध्वनीद्वारे त्या सोनार यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाबाबत त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यांनी, “या संदर्भात कुटुंबाशी चर्चा करून सांगतो,” असे उत्तर दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
झुंजवाडकर यांनी यापूर्वीही या प्रकरणासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख व खानापूर पोलीस ठाण्यात रितसर अर्ज करून ५ ऑक्टोबरपासून स्टेशनवर रोडवरील त्या ज्वेलरीच्या दुकानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, या प्रकरणाकडे खानापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
त्या नामांकित ज्वेलर्स चे नावही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण खानापूर लाईव्ह ने नावाची गुप्तता राखली आहे. अजूनही तडजोडीचा भाग म्हणून प्रयत्न सुरू असले तरी 5 तारखेला जुजंवाडकर यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर त्यांचे नाव उघडकीस येणारच आहे.