Home » खानापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत सुरू करा! खासदारांना भाजपा अल्पसंख्यांक विभागातर्फे निवेदन!

खानापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत सुरू करा! खासदारांना भाजपा अल्पसंख्यांक विभागातर्फे निवेदन!

IMG-20261001-WA0033(1)

खानापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत सुरू करा

स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची भाजपा अल्पसंख्यांक विभागाची मागणी

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत अथवा उद्योग प्रकल्प सुरू करून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खानापूर तालुका भाजपा अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे सध्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत, तर विठ्ठल सोमण्णा हलगेकर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.

खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग असून अनेक सुशिक्षित व कुशल युवकांना स्थानिक पातळीवर योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. रोजगारासाठी अनेक युवकांना बेळगाव, गोवा, पुणे, मुंबई तसेच इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याने स्थानिक पातळीवर उद्योगनिर्मितीची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्यात उपलब्ध असलेली जमीन, मनुष्यबळ आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून मोठी औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी, तसेच या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार मिळावा, अशी मागणी करण्यात आली. युवकांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

औद्योगिक प्रकल्प सुरू झाल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच स्थानिक व्यवसाय, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि इतर पूरक उद्योगांना चालना मिळू शकते. त्यामुळे खानापूर तालुक्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बेरोजगारीच्या प्रश्नावर उद्योगाची गरज

यावेळी खानापूर तालुका भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे जॉर्डन गोसावीस यांनी खानापूर लाईव्हशी बोलताना सांगितले की, खानापूर तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असून रोजगारासाठी अनेकांना परप्रांतात जावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळेही स्थानिक रोजगाराच्या प्रश्नाची तीव्रता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

“तालुक्यातील अनेक बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यात औद्योगिक केंद्र सुरू करण्यासाठी खासदारांनी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करावेत, अशी आमची अपेक्षा आहे. यासाठीच आम्ही खासदारांना निवेदन दिले आहे,” असे गोसावीस यांनी सांगितले.

निवेदन देताना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जॉर्डन गोसावीस, निवृत्त मुख्याध्यापक व्ही. बी. होसूर, फिलिप रॉड्रिग्स, मायकेल आंद्रादे, रिचर्ड मॅनेजिस आदी उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

  • खानापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत सुरू करावी.
  • स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे.
  • युवकांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे.
  • स्थानिक मनुष्यबळ व संसाधनांचा औद्योगिक विकासासाठी वापर करावा.
  • औद्योगिक प्रकल्पासाठी शासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.
Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us