Oplus_16908288

Oplus_16908288

रात्री ९ वाजता हेब्बाळ येथे अंत्यसंस्कार; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी

खानापूर : सांगलीतील कुपवाड परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन नागप्पा केसरेकर यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यापूर्वी त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे केसरेकर कुटुंबावर दुसरा मोठा आघात झाला असून, हेब्बाळ गावासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मोहन केसरेकर यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोहन केसरेकर यांच्यावर मंगळवारी रात्री ९ वाजता हेब्बाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संस्था, राजकीय संघटना आणि नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. हल्ल्यातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी करण्यात येत आहे.

या घटनेमुळे हेब्बाळसह खानापूर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

पती-पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूने हेब्बाळसह खानापूर तालुक्यावर शोककळा;

खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मूळ रहिवासी असलेल्या केसरेकर दाम्पत्यावर सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे १५ ऑगस्ट रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला दुर्दैवी वळण मिळाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मोहन नागाप्पा केसरेकर यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (वय ३७) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे काही दिवसांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे.

हल्ल्यानंतर मोहन केसरेकर यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, आज रात्री हेब्बाळ येथे मृतदेह आणण्यात येणार आहे. रात्री सुमारे ९ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

आरोपीचे घर प्रशासनाकडून जमीनदोस्त

दरम्यान, या गंभीर प्रकरणातील आरोपीचे घर प्रशासनाकडून जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर परिसरात या प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविण्याचे आश्वासन

या घटनेनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोहन केसरेकर यांचे चुलत भाऊ श्रीधर केसरेकर यांच्याशी संपर्क साधून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीविरोधात फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याबाबत तसेच लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच मोहन केसरेकर यांच्या पश्चात राहिलेल्या मुलगा आणि मुलीच्या पालकत्वाबाबत प्रशासनाकडून मदत करण्याची ग्वाही देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी

पती-पत्नीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हेब्बाळ गावासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत असून, आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळावा, आरोपीला जलदगतीने शिक्षा व्हावी आणि पीडित मुलांच्या भवितव्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us