कोरोना महामारीनंतर चोऱ्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. बेरोजगारी आणि तरूणांत वाढीस लागलेला चंगळवाद याला जबाबदार आहे. सध्या दिवसाआड एकतरी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरीक त्रस्त आहेत. विशेषत: ग्रामिण भागात चोरीच्या घटना अधिक घडत आहेत. त्यापूर्वीही घडत होत्या. पण, यापासून दुर्गम आणि छोटी खेडी अपवाद होती. आता मात्र सरसकट सर्वच गावांना चोरट्यांनी ‘टार्गेट’ केले आहे. जणू गावांवर ‘चोरधाड’ पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुगीचा हंगाम असल्याने शेतकरी कुटुंब घरे कुलूपबंद करून शेतीत खपत असतांना त्याचा फायदा उठवून चोर हात साफ करून घेत आहेत. चोरांची टोळकी यामागे कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे.
फेरीवाले चोर
शहरी भागात बंद घरे चोरांकडून टार्गेट केली जाण्याची जुनी पध्दत आता खेड्यांपर्यंत पोहचली आहे. शहरी भागात एकमेकांच्या घरात न डोकावण्याच्या संस्कृतीमुळे चोऱ्या खपून जात होत्या. पण हल्ली सगळीकडे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरल्यामुळे चोरांनाही असुरक्षित वाटत असावे. परिणामी त्यांनी मोर्चा ग्रामिण भागाकडे वळविला आहे. चोर खेड्यांमध्ये गृहपयोगी वस्तू विकण्याच्या बहाण्याने येऊन पाळत ठेवतात. त्यानंतर निर्जनस्थळ आणि तुरळक लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये चोरी करायची अशी या चोरट्यांची चौर्यपध्दत असल्याचे आढळून आले आहे. बंद घरांना टार्गेट करतांना कडी-कोयंडा तोडला जात आहे. बहुतांश चोरीच्या घटनांमध्ये साधर्म्य असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होत आहे.
शिरजोर चोर
चोरीच्या घटनांत एखादा चोर सापडला की, त्याची ‘हिस्टरी’ पोलिसांकडे तयार होते. कोठेही चोरीची घटना घडल्यास ती पडताळून पाहून संबंधीत चोरट्यांची चौकशी केली जाते. चोरीच्या घटनेत संबंध आढळल्यास त्या चोरट्याला अटक केली जाते. ही पोलिस तपासाची जुनी पध्दत आहे. परंतु, चोर नविन असेल तर तो पोलिसांना सापडणे अवघड होते. कारण त्याची नोंद कुठेच नसते. सध्या चोरीच्या घटनांत सहभागी असणारे चोरटे हे अशा कॅटॅगिरीतील आहेत. त्यात बहुतांश तरूणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. कोरोना महामारीत अनेकजन बेरोजगार झाले. त्यांचे पूनर्वसन करण्यात सरकार कमी पडल्याने चोरांची संख्या वाढल्याचा तज्ञांचा दावा आहे. अनेक तरूण चंगळवादाच्या आहारी गेले आहेत. वाहने खरेदी आणि मेजवान्यांसाठी पैसा मिळावा म्हणून हे तरूण चोऱ्यांकडे वळले आहेत, असे त्यांचे मत आहे.
पोलिस कमजोर?
मोठ्या प्रमाणात चोरीच्या घडत असतांना पोलिस काय करीत आहेत? असा सामान्य प्रश्न नागरीकांतून उपस्थित होत आहे. चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी जाऊन तपास करीत आहेत. गेल्या कांही दिवसात अनेक गावांत मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पण, चोर कांही सापत नसल्याने पोलिसांचीदेखील झोप उडाली आहे. जिल्ह्यात आधीच पोलिसबळ कमी आहे. त्यात पोलिसांवर चोऱ्यांच्या तपासाऐवजी इतर कामांचा ताण आहे. त्याशिवाय अधिकाधीक कर्मचाऱ्यांना वाहने अडवून ‘फाईन’ वसुलीच्या कामावर जुंपले जात आहे. त्यामुळे पोलिसांना चोरीच्या तपासासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याचे सांगितले जाते. एकंदर पोलिस यंत्रणा कमजोर झाली असल्याचेच दिसून येत आहे.
कुचकामी यंत्रणा
चोरीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्याकडून गावागावात बैठका घेऊन जागृती केली जात आहे. एका गावात अशीच बैठक सुरू असतानाच त्या गावात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तसेच चोर खरंच शिरजोर झाले आहेत. ते पोलिसांनाही घाबरेनासे झाले आहेत. एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एकही चोरटा कैद झालेला नाही. एकुण यंत्रणा कुचकामी झाल्याचे दिसते. आता नागरीकांनी स्वत:च्या घरांच्या संरक्षणासाठी सज्ज व्हायला हवे.
I would like to thank you for the efforts youve put in penning this website. I really hope to check out the same high-grade content by you later on as well. In truth, your creative writing abilities has encouraged me to get my own website now 😉