खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूल, चापगाव येथील विद्यार्थिनी ज्योत्स्ना जोतिबा हंगिरकर हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या चपळतेचा, मेहनतीचा आणि चिकाटीचा उत्तुंग आविष्कार करत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक,तसेच ४×१०० मीटर रिले स्पर्धेसाठी निवड मिळवत चापगाव गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

नुकताच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये स्पर्धांमधील ज्योत्स्नाचे नेत्रदीपक यश लक्षवेधी ठरले असून, तिची निवड आता राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे मलप्रभा हायस्कूलमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जोशनाच्या यशामागे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,तसेच मुख्याध्यापक श्री. पी. बी. पाटील सर आणि शाळेचे शारीरिक शिक्षक श्री. आर. टी. केसरकर सर यांचे अतुलनीय मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्याचबरोबर संपूर्ण शिक्षकवृंद व पालक वर्गाचे सहकार्य हेही तिच्या यशाचे खरे शिल्पकार ठरले. गावातील क्रीडारसिक नागरिक, ग्रामस्थ, शाळेचे सर्व विद्यार्थीवर्ग व पंचक्रोशीतील क्रीडा रसिक जोश्नावर कौतुकाचा वर्षाव करत असून, तिच्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तिच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे अन्य विद्यार्थ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.