
फोटो : खानापूर : सीमा सत्याग्रहींचा सत्कार करताना माजी मंत्री सुभाष देसाई बाजूला डॉ. दीपक पवार, नारायण कापोलकर, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, डॉ. अजय दसारी व इतर.
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
सीमाभागाला महाराष्ट्राशी अतूट अशा धाग्यात जोडण्याचे काम मराठी भाषेने केले आहे. भाषेच्या आधारावरच महाराष्ट्राने सीमाभागावर आपला हक्क सांगितला आहे. भाषा समाजाला-देशाला जोडण्याचे काम करते. मराठी हा सीमाभाग आणि महाराष्ट्र यामधील समान धागा आहे. तो अधिक दृढ आणि घट्ट व्हावा यासाठी प्रबोधनकार ठाकरे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. सीमाभागातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि कायम एकत्र ठेवण्यासाठी हे वाचनालय उपयोगी येईल. असे मत महाराष्ट्राचे माजी उद्योग आणि मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर शिवस्मारकात झालेल्या सभेत त्यांनी सीमावासियांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
देसाई म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमावासिय कडवा संघर्ष करत आहेत. प्रश्नाची तड कधी लागेल हे माहीत नसताना त्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देणे. आणि संघर्षाचे व्रत सतत सुरू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. प्रश्न सुटेल की नाही याबद्दल मनात शंका असती तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांनी त्या वेळेचे आंदोलन अर्धवट सोडले असते. त्यांच्या मनात काडीचीही शंका नव्हती. त्यामुळेच ते ठामपणे लढले. स. का. पाटील यांनी तर चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे सांगितले होते. पंडित नेहरूंनी 1954 साली मुंबई केंद्रशासित करण्याचा ठराव मांडला. त्याला विरोध करताना सी. डी. देशमुख यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देताना नेहरूंना तुम्ही हुकुमशाह आहात असे लोकसभेत ठणकावून सांगितले. लाखो मराठी माणसांनी ते आंदोलन धगधगते ठेवले. त्यामुळे अखेर नेहरुंना माघार घेत मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. त्याच पद्धतीने हा संघर्ष जिवंत ठेवून सीमाभाग महाराष्ट्राला जोडल्या वाचून राहणार नाही. ते पुढे म्हणाले, नाटक, भजन, वाचन, शाळा, ग्रंथालये ही मराठी जिवंत ठेवणारी साधने आहेत. सीमाभागातील नाट्य चळवळींसाठी भरीव कार्य करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दीपक पवार म्हणाले, मराठी जिवंत राहण्यासाठी मराठीशी निगडित प्रत्येक घटकाने मराठी शाळांच्या संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकणार आहे. कर्नाटकातील राजकारणी पहिल्यांदा कन्नड भाषिक म्हणून एकत्र येतात. त्यानंतर ते जातीचा आणि पक्षाचा विचार करतात. महाराष्ट्राच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. सीमाभाग आणि सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वपक्षीय एकजूट आणि एकमत असणे गरजेचे आहे. राज्य पुनर्रचनेत सीमाभाग महाराष्ट्राला न मिळणे हा तत्कालीन सरकारने केलेला सर्वात मोठा घोटाळा आहे. हा केवळ अस्मितेचा प्रश्न नाही हा नैतिकतेचा आणि संघराज्याच्या निष्ठेचा प्रश्न आहे. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड सोनाप्पा नंद्रणकर यांची भाषणे झाली. सीमा सत्याग्रही शंकर पाटील, नारायण लाड, कारलगा येथील भजन भारुड मंडळ, डॉ. सुनिता राक्षे, सुनील चिगुळकर, चाळोबा अळवणी, सविता मिराशी यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अजय दसारी, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, अमृत शेलार, संजय कुबल, प्रसाद पाटील, महादेव घाडी, अनंत पाटील, डी. एम. भोसले, लक्ष्मण बामणे, रमश धबाले, मल्लाप्पा मारीहाळ, विनायक मुतगेकर, एस. जी. शिंदे, महाबळेश्वर पाटील, कृष्णा मन्नोळकर, राजाराम देसाई, डी. एम. गुरव आदी उपस्थित होते. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.

नव्या पिढीने लढ्याचा इतिहास समजून घ्यावा!
सीमा प्रश्नाच्या धगधगत्या संघर्षाचा इतिहास नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेले कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न संघर्ष आणि संकल्प हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर बारकाईने प्रकाश टाकणारा, सीमा प्रश्न जसा आहे तसा समजावून सांगणारा एकमेव ग्रंथ असल्याचे सांगून त्याचेही प्रत्येकाने गांभीर्याने वाचन करावे असे आवाहन माजी मंत्री देसाई यांनी केले. सीमाभागातील सीमा सत्याग्रही तसेच कार्यकर्त्यांच्या मुलाखतीच्या पुस्तकाचेही लवकरच प्रकाशन केले जाणार आहे. त्याचीही जबाबदारी डॉ. दीपक पवार यांच्यावर सोपविण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.