खानापूर:
खानापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती इथले हवामान शेतीला खूपच उपकारक ठरले आहे. त्यामुळे भात भुईमुंग ऊस ही महत्त्वाची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. इथल्या मातीत राबून घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या या अचाटकर्तृत्वामुळेच खानापूर तालुक्याचे वेगळेपण सिद्ध झाले आहे. असे विचार रुद्र स्वामी मठाचे मठाधीश चनबसव देवरू यांनी खानापूर येथे मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थी संघटना, कॉमर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात उद्घाटक या नात्याने बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी होत्या.
कार्यक्रमात स्वागत प्रा. विजयालक्ष्मी तीर्लापूर यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. आय एम गुरव यांनी केले.
या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रातील प्रमुख वक्ता या नात्याने बोलताना निवृत्त प्राचार्य प्रा. एस. जी सोन्नद म्हणाले की, “आपण ज्या परिसरात वावरतो त्या परिसरातील जनमानसाशी एकरूप व्हावयास हवे. आज खानापूर तालुक्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आपली आर्थिक परिस्थिती सुधारतो आहे. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शिवाय जैविक शेती ही आज मानवाला वरदान ठरली आहे, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे रासायनिक पिकांचा पर्याय शोधण्यापेक्षा जैविक पद्धतीच्या शेतीला प्राधान्य द्या !” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य बागेवाडी म्हणाल्या “शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणजे दलाल दलालीतून जेव्हा शेतकरी बाहेर पडेल तेव्हाच शेतकऱ्याच्या जीवनात सुखाचे दिवस येतील..असे विचार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.” डॉ. आर. एस. तीरवीर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. जे. व्हि. अंची यांनी आभार व्यक्त केले.
तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
चर्चासत्राची औचित्य साधून खानापूर तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘ नांगरधनी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात नंदगड विभागातून श्री. गजानन चव्हाण यांना दूध उत्पादनाचा उच्चांक गाठल्याबद्दल, श्री. महांतेश वाली यांना हापुस आंबा पिकाचे यशस्वी उत्पादन घेतल्याबद्दल, श्री. संतोष मनेरिकर असोगा यांना नारळ या आंतरपिकातून लाखो रुपयांचे उत्पादन घेतल्याबद्दल, श्री. सिकंदर सनदी, चापगाव यांना मत्स्यपालनात आदर्शवत कार्य केल्याबद्दल, श्री. जगदीश्वर रेड्डी यांना दुर्मिळ झाडांची प्रयोगात्मक लागवड आणि संगोपन केल्याबद्दल, श्री. रामनाथ सुखये जामगाव या तरुणाला सेंद्रिय खत निर्मिती उपक्रमाबद्दल, श्री. चंद्रकांत पाटील गर्लगुंजी यांना एकरी ६० टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल, श्री. शिवानंद सुळकर, खानापूर यांना केळी पिकातून आदर्शवत उत्पादन घेतल्याबद्दल श्री. विमलनाथ हारगोप, कोडचवाड यांना जैविक पद्धतीने गूळ उत्पादन करत शेतकऱ्यांना आदर्श निर्माण करून दिल्याबद्दल, तर मालोजी गुरव -गुरव गल्ली खानापूर या शेतकऱ्याला केवळ 30 गुंठ्यात तेरा लाखाचे उत्पन्न घेतल्याबद्दल ‘नांगरधनी’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रत्येक पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपली यशोगाथा ओघवत्या वाणीत व्यक्त केली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग माजी विद्यार्थी संघटनेचे व कॉमर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. आय. टी. बडगेर, श्रीमती जे. व्ही. बनोशी, प्रा. पांडुरंग भातकांडे, प्रा. भागन्ना पाटील, प्रा. कपिल गुरव, श्री. दत्ता गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.