IMG-20230228-WA0025

खानापुरात मराठी भाषा दिन साजरा : गुणवंतांचा सत्कार

खानापूर :

सगळ्याच ठिकाणी प्रमाण भाषेचा आग्रह न धरता मराठीतील वेगवेगळ्या ग्रामीण बोलीभाषांचाही योग्य सन्मान करणे आवश्यक आहे. या बोलींमुळे मराठी भाषेला माधुर्य आणि गोडवा प्राप्त झाला आहे. म्हणूनच ती अन्य भाषिकांना आकर्षित करते. कोणतीही भाषा कोणाची वैरी असू शकत नाही. मराठी तर माणसे आणि मनांना जोडणारी, सुसंवाद वाढीस लावणारी भाषा आहे. असे प्रतिपादन मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आय. एम. गुरव यांनी केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.


प्रा. डॉ. गुरव म्हणाले, खानापूर परिसरात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचे वेगळे सौंदर्य आहे. येथील बोलीवर कोंकणी, कन्नडचा प्रभाव असल्याने बोलण्यात रांगडेपणा आहे. स्थानिक परिसरातील ताम्रपट आणि शिलालेखांचा अभ्यास होणे आवश्यक असून लोकसंस्कृती, लोककला आणि लोक परंपरांतून मराठी टिकली आहे. त्याकरिता या कला व संस्कृतींचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शिवरायांच्या स्वराज्यातील 350 किल्ल्यांपैकी 3 किल्ले खानापूर तालुक्यात आहेत. येथील धनंजय मुद्रणालय या जुन्या छपाई केंद्रात मराठीतील अनेक नामवंत साहित्यिकांच्या ग्रंथांचे मुद्रण झाले आहे. मोचनगड ही पहिली ऐतिहासिक कादंबरी जांबोटीच्या रा. भि. गुंजीकर यांनी लिहिली. मराठीचा हा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे कार्य नव्या पिढीकडून होणे आवश्यक असल्याचे डॉ. गुरव यांनी नमूद केले.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी मातृभाषा मराठी संवर्धनासाठी समाज आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असून प्रत्येकाने मुलाच्या अथवा मुलीच्या शिक्षणासाठी मातृभाषेच्या शाळेची निवड करावी असे आवाहन केले.


महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर म्हणाले, मराठी भाषा ही संत साहित्य, अभंग आणि अनमोल ग्रंथांनी समृद्ध आहे. मराठी भाषेने आम्हा सगळ्यांवर माणुसकीचा संस्कार केला आहे. म्हणून आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. मातृभाषा मराठीवरच आमचे अस्तित्व अवलंबून असून मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी लागेल ते योगदान देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी गेल्या बारा वर्षापासून प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा सादर केला. सरकारी शाळांमध्ये गुणात्मक शिक्षण उपलब्ध झाल्यास कोणताही पालक अन्य माध्यमाच्या शाळेकडे वळणार नाही. हा विश्वास शिक्षकांना मिळवून दिला. त्याचा परिणाम म्हणून अनेक शाळा प्रयोगशील झाल्या. शिक्षक तंत्रस्नेही झाले. शाळांचे रूप पालटले. त्यामुळे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असल्याचे सांगितले.
भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, म. ए. समिती नेते आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, खानापूर को ऑप बँकेचे चेअरमन अमृत शेलार, रुक्मान्ना जुंजवाडकर, निरंजन सरदेसाई, म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, दीपक देसाई, जयराम देसाई, मुकुंद पाटील, रमेश धबाले, स्थायी समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, संगीत विशारद मष्णू चोर्लेकर, एस. जी. शिंदे, पी. के. चापगावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, प्रसाद पाटील, डी. एम. भोसले, मारुती परमेकर, एन. एम. पाटील, अनंत पाटील आदि उपस्थित होते.
गायन, वक्तृत्व, निबंध आणि सामान्य ज्ञान परीक्षेतील विजेत्यांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व मिलाग्रिज चर्च मराठी शाळेला ज्ञानसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पीटर डिसोजा, डॉ. आय. एम. गुरव यांना ज्ञानसाधक तर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे यांचा लोक साधना पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन तर प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us