आंबोली : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना पुन्हा एकदा तिकीट आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात १४ वर्षा वरील व्यक्तीला २० रुपये तर ५ वर्षावरील मुलास १० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क आकारण्याचा अधिकार वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक एस. नवकीशोर रेड्डी यांनी दिली.
कोरोना काळापूर्वीपासून आंबोली आणि पार्पोली गावकऱ्यांच्या संघर्षामुळे शुल्क आकारणी थांबविण्यात आली होती. मात्र आता ८ जुलैपासून अमंलबजावणी होणार आहे. याबाबतचा निर्णय स्थानिक वनव्यवस्थापन समितीकडून घेण्यात आला आहे. यातून मिळणारी रक्कम ही धबधबा व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या मजूरांसाठी तर उर्वरीत रक्कम ही पारपोली, आंबोली व चौकुळ या गावच्या वनविकासासाठी वापरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकीशोर रेड्डी यांनी दिली.
आंबोली घाटात असलेल्या धबधब्यावर तीन वर्षापुर्वी प्रत्येकी १० रुपये असे शुल्क आकारण्यात येत होते. मात्र आंबोली धबधब्याची मालकी नेमकी कुणाची यावरुन पारपोली व आंबोली या वनव्यवस्थापन समित्या मध्ये वाद झाल्याने ही आकारणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात यावर कोणतीही चर्चा झालीदरम्यान आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना तिकीट आकारण्याचा निर्णय संबंधित वनव्यवस्थापन समित्यांकडून घेण्यात आला आहे. समित्यांच्या संयुक्त बैठकीत तसा निर्णय झाला असून येत्या शनिवार पासून ही अमंलबजावणी होणार आहे, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
आंबोली निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व वर्षा पर्यटनासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक आंबोली धबधब्यास भेट देत असतात. पर्यटकांच्याकडून धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात प्लास्टीक कचरा, बॉटल, खाद्यपदार्थाचे रॅपर तसेच इतर घनकचरा केला जातो. त्यामुळे पर्यावरणास बाधा निर्माण होऊन वनातील जैवसाखळीवर त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच पर्यटकांकडून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे वन्य जीवांच्या अधिवासास बाधा निर्माण होते.
वनविभागाने धबधब्याच्या व्यवस्थापनाबाबत व तेथील घनकचरा साफ करून सदर परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नियोजन केले आहे. वनास व पर्यावरणास बाधा पोहचवणाऱ्या बाबींचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांकडून उपद्रव शुल्क वसुल करण्यात येणार आहे.
मुख्य धबधब्यावरील पर्यटन उपद्रव शुल्क वसुल करताना तसेच अनुषंगीक बाबींमध्ये कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था याचा भंग झाल्यास पोलिस बळाची मदत घेतली जाईल व संबंधीत कायदा व सुव्यवस्था ‘मोडण्यऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व नियमानुसार दंडात्मक रक्कमेची आकारणी करण्यात येईल, असा आदेश जारी केला आहे.
पर्यावरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर कारवाई : उपवनसंरक्षक रेड्डी
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये. वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव अधिनियम 1972 या कायद्यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ड प्रमाणे शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी वन विभागाचे उप वनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिला आहे.